उमेश पाटील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल हाती घेणार !

 



उमेश पाटील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल हाती घेणार !


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 

त्यांनी पक्ष सोडू नये, यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, उमेश पाटील आपल्या राजीनाम्यावर ठाम आहेत. महाविकास आघाडीतील पक्षाकडून त्यांना पक्षप्रवेशाचे निमंत्रण मिळाले असून ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल हाती घेणार, याची चर्चा मोहोळच्या राजकारणात रंगली आहे.

काही दिवसांपूर्वी उमेश पाटील यांनी आगामी राजकीय वाटचालीसाठी मेळावा घेत अजित पवार यांना सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याच मेळाव्यात काही उत्साही कार्यकर्त्यांनी अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) सोडण्यासाठी पेटवून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे कार्यकर्त्यांकडूनही उमेश पाटील यांच्यावर अजित पवार यांची राष्ट्रवादी सोडण्यासाठी दबाव आहे. त्यातूनच त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

उमेश पाटील यांना महाविकास आघाडीतील काही पक्षांकडून ऑफर आल्याची माहिती आहे. मात्र, ते कोणता झेंडा हाती घेतात, याकडे मोहोळ तालुक्याचे लक्ष असणार आहे. उमेश पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाणार याची तालुक्यात जोरदार चर्चा आहे.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काही दिवसानंतर माजी आमदार राजन पाटील यांनीही पवारांच्या राष्ट्रवादीत येण्याचा निर्णय घेतला तर पुन्हा कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे उमेश पाटील हे विचारपूर्वक पावले टाकत आहेत, असे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. उमेश पाटील हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील, अशी चर्चा रंगली आहे, त्याबाबत उमेश पाटलांकडून मात्र कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही.  

परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्ष्याकडे त्यांचे झुकते माप दिसून येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

No comments