उद्धव ठाकरे कोकणात राणेंना शह देण्याच्या तयारीत !
उद्धव ठाकरे कोकणात राणेंना शह देण्याच्या तयारीत !
येत्या 12 जुलैला विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होत आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न होता. मात्र, ठाकरे गट एक वेगळा डाव टाकण्याच्या तयारीत आहे.
आगामी विधानपरिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे एक मोठा डाव टाकण्याच्या तयारीत आहेत. या निवडणुकीत ठाकरे गटाकडून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेले माजी खासदार विनायक राऊत यांना रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे.
विधानसभेतील संख्याबळानुसार यापैकी नऊ जागांवर महायुतीचे आणि दोन जागांवर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतात. तर 11 व्या जागेवरुन शेकापचे जयंत पाटील रिंगणात उतरणार आहेत. त्यासाठी शरद पवार गटाने जयंत पाटील यांना पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, ठाकरे गटाने अद्याप त्यांना पाठिंबा दिलेला नाही. कारण, या जागेवरुन उद्धव ठाकरे हे विनायक राऊत यांना रिंगणात उतरवण्याचा विचार करत असल्याची माहिती आहे.
ठाकरे गटाने 11 व्या जागेसाठी विनायक राऊत यांना रिंगणात उतरवल्यास विधानपरिषद निवडणुकीत चुरस निर्माण होऊ शकते. महाविकास आघाडीला विधानपरिषदेच्या 3 जागा निवडून आणायच्या झाल्यास 69 मतांची गरज आहे. मात्र, मविआतील तीन पक्षांकडे मिळून 65 आमदारांचे संख्याबळ आहे.
त्यांच्यासोबत शेकाप आणि एक अपक्ष आमदार आहे. मात्र, शेकापच्या जयंत पाटील यांना स्वत:ला विधानपरिषदेची निवडणूक लढायची असल्याने ते मविआला पाठिंबा देणार नाहीत. अशावेळी मविआने विनायक राऊत यांना रिंगणात उतरवले तरी उरलेल्या मतांची बेगमी कुठून करणार, हा प्रश्न आहे. त्यामुळे आता मविआ विनायक राऊत यांना रिंगणात उतरवणार की जयंत पाटील यांना पाठिंबा देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
No comments